Join MultiplyOpen a Free ShopSign InHelp
MultiplyLogo
SEARCH

"निषाद", पुणे

असफलता, नैराश्‍य, प्रेमभंगाचं दुःख, जीवनातील उपेक्षा, प्रियतमेच्या विरहाची व्याकुळता...या अशा विविध "सिच्युएशन्स"वर आजपर्यंत अनेक दिग्गज कवी-गीतकार-शायरांनी, प्रतिभावंत संगीतकारांनी, गायक-गायिकांनी आणि नायक-नायिकांनी आपली अदाकारी सादर केलेली आहे. या सर्जनशील कलावंतांचे हे सुंदर क्षण "सेल्युलॉईड"च्या पट्टीवर अप्रतिम शिल्पांच्या रूपामध्ये अजरामर झाले आहेत. चित्रपटसंगीताच्या शौकिनांनी पिढ्यान्‌पिढ्या आपली दुःखे या "दर्दभऱ्या' गाण्यांच्या साथीने मोठ्या प्रेमाने उरी-ओठी जपली. 
"जब दिल ही टूट गया, हम जी के क्‍या करेंगे' आणि गम दिये मुस्तकिल कितना नाजुक है दिल, ये ना जाना, हाए हाए ये जालिम जमाना' या स्वरसम्राट कुंदनलाल सैगलच्या गाण्यांपासून ते थेट आजच्य जमान्यातल्या "लुट गए ऽऽ हां लुट गए लुट गए हम तेरी मोहोब्बत में'पर्यंत प्रत्येक पिढीने आपली दुःखं या अशा गाण्यांना जवळ करून हलकी केली. "मेरा सुंदर सपना बीत गया', "वक्त ने किया क्‍या हॅंसी सितम', गाणारी गीता दत्त, "रसिक बलमा', "चांद फिर निकला', किंवा "रंगीला रे' गाणारी लता, "चैन से हम को कभी आप ने जीने ना दिया' किंवा "मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है' गाणारी आशा...
"सूर ना सजे', "कस्में-वादे प्यार वफा' आणि "पूछो ना कैसे मैने रैन बिताई' गाणारा मन्ना डे, "दुखी मन मेरे', "तेरी दुनिया से हो के मजबूर', "जिंदगी का सफर' आणि बडी सूनी सूनी है जिंदगी ये जिंदगी' गाणारा भावुक किशोर...
"जाने वौ कैसे लोग थे जिन के प्यार को प्यार मिला', "तेरी दुनिया मे जीने से तो बेहतर है के मर जाएं' गाणारे हेमंतदा, रफीसाहेबांच्या गाण्यांविषयी काय नि किती बोलावे? "टूटे हुए ख्वाबों ने हम को ये सिखाया हैं', "दोनों ने किया था प्यार मगर'पासून ते थेट १९८० च्या दशकां  पर्यंतच्या "क्‍या हुआ तेरा वादा', "तेरी गलियों में ना रख्खेंगे कदम'पर्यंत अनेक गीतांमध्ये हा दर्द आपल्यामध्ये दिसतो. 
"याद आ रही है' (लव्ह स्टोरी) - अमितकुमार, "और इस दिल मे क्‍या रख्खा है (इमानदार)-सुरेश वाडकर, याद तेरी आएगी(एक जान है हम)-शब्बीरकुमार, "अब ते बिन जी लेंगे हम(आशिकी)-कुमार सानू, अच्छा सीला दिया तूने (बेवफा सनम)-सोनू निगम...या गाण्यांनाही त्या त्या वेळच्या "दर्दी' रसिकांनी दाद दिली होती. 
असं असलं तरी, आर्त-व्याकुळ, दर्दभऱ्या, प्रेमभंगाच्या, विरहगीतांची जेव्हा याद येते, तेव्हा...."काळजाचा ठाव घेणारी गाणी' हा बालेकिल्ला असणाऱ्या दोन महान गायकांना आपण कधीही विसरू शकत नाही आणि ते दोन गायक म्हणजे तलत महम आणि मुकेश! 
जेव्हा जेव्हा चित्रपटांमध्ये अशा प्रकारची गाणी आली, तेव्हा तेव्हा प्रतिभावंत संगीतकारांनी आपल्या खास ठेवणीतल्या रचना आवर्जून या दोघांना बहाल केल्या किंवा असेही म्हणू या की, या दोघांना समोर ठेवून काही स्वररचना निर्माणही केल्या गेल्या. 
"आँसू समझ के क्‍यूं मुझे आँख से तू ने गिरा दिया', "तसवीर बनाता हूँ, तसवीर नही बनती', सब कुछ लुटा के होश मे आए तो क्‍या किया', "मेरी याद मे तुम ना आँसू बहाना,' "जाए तो जाए कहॉं, "ऐ मेरे दिल कहीं और चल'...यांसारखी गाणी गाणार "मखमली' तलत किंवा "तेरी दुनिया मे दिल लगता नहीं', "सारंगा तेरी याद में नैन हुये बेचैन', "भूली हुई यादों मुझे इतना ना सताओ", "आँसू भरी है ये जीवन की राहें', "चल री सजनी अब क्‍या सोचें', "वो तेरे प्यार का गम, इक बहाना था सनम', "मै तो इक खवाब हूं, इस ख्वाब से तू प्यार न कर', "कोई जब तुम्हारा हृदय तोड दे, तडपता हुआ जब कोई छोड दे' गाणारा दर्दभरा मुकेश...म्हणजे कानसेनांच्या "मर्मबंधातली ठेव'च जणू! 
भग्नहृदयी प्रेमिकांची प्रतिमा असणाऱ्या "ट्रॅजिडी किंग' दिलीपकुमारच्या आवाजाचा कब्जा महंमद रफीने घेण्याआधी या दोघांनीही दिलीपकुमारसाठी उत्तमोत्तम गाणी गाइली आणि दिलीपकुमारच्या पडद्यावरच्या प्रतिमेशी ती उत्तमरीत्या "मॅच'ही झाली होती. नौशाद यांनी "मेला', "अंदाज' आणि "अनोखी अदा' या चित्रपटांमध्ये "गाए जा गीत मीलन के, तू अपनी लगन मे', "हम आज कहीं दिल खो बैठे, यूं समझो किसी के हो बैठे', "तू कहे अगर जीवनभर मै गीत सुनाता जाऊं', "टूटे ना दिल टूटे ना,' "झूम झूम के नाचो आज, गाओ आज, गाओ खुशी के गीत', "भूलनेवाले याद न आ'..अशी सुंदर गाणी मुकेशला दिली होती व या गाण्यांनी प्रचंड लोकप्रियताही मिळवली. 
इकडे दिलीप-तलत "कॉम्बिनेशन'सुद्धा जोरात होते. अनिल विश्‍वासने "ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल जहॉं कोई न हो'च्या (आरजू) रूपाने याची सुरवात केली होती. नौशाद यांनी "बाबूल"साठी "मिलते ही आँखे दिल हुआ दीवाना किसी का' तलतला देऊन हे समीकरण आणखी घट्ट केले. "ये हवा, ये रात ये चॉंदनी तेरी हर अदा पे निसार है', "सीने मे सुलगते है अरमॉं, आँखो मे उदासी छाई है', "किस को खबर थी' "मितवा ये अनबुझ प्यास', "ऐ मेरे दिल कहीं और चल' आणि शामे गमकी कसम आज गमगीं है हम'ने ही जोडी लोकप्रियतेच्या शिखरावर गेली आणि यामुळेच बिमल रॉय यांच्या "यहुदी'साठी जेव्हा शंकर-जयकिशन यांनी "ये मेरा दीवानापन है, या मुहब्बत का कुसूर' या अप्रतिम गाण्याला तितकीच सुंदर चाल लावली, तेव्हा आपल्यासाठी हे गाणे तलतनेच गावे, यासाठी नायक दिलीपकुमारने हट्ट धरला होता, तर दिग्दर्शक बिमल रॉय यांच्या मनात या गाण्यासाठी महंमद रफी होता. 
मात्र, संगीतकार शंकर-जयकिशन यांच्या मनात या गाण्यासाठी होता मुकेश! कारण चाल बाताना त्या गाण्याला कोणता गायक न्याय देऊ शकेल, याचा पूर्ण अंदात संगीतकाराला आलेला असतो. या मताशी शंकर-जयकिशन ठाम होते. आता काय करायचे? कारण अती ताणले तर शंकर-जयकिशन यांच्यासारख्या मानी संगीतकारांनी चित्रपट सोडून द्यायलासुद्धा मागे-पुढे पाहिले नसते व अर्थात निर्मात्याला हे परवडले नसते. शेवटी, यावर एक नामी तोडगा काढण्यात आला. तिन्ही गायकांच्या नावाने चिठ्ठ्या टाकण्यात आल्या आणि या चिठ्ठ्यांनी कौल दिला तो शंकर-जयकिशन यांच्या बाजूने! अर्थातच मुकेशने या गाण्याचे सोने केले, हे नंतर दिलीपकुमारनेही खुल्या मनाने मान्य केले. आता अशी कल्पना करा की महंमद रफी आणि तलत महमूद यांनी हे गाणं कसं गाइले असते? 
-चंद्रशेखर महामुनी.
nishad.pune@gmail.com
सकाळ - आठवा रंग - जीवनगाणे !



Add a Comment